पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी.राज्यात पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईसाठी ही एक मोठी संधी.
📍मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय.
एस.के.24 तास
मुंबई : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होती.तो क्षण अखेर आला आहे. राज्य सरकारने पोलीस भरती संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया रखडलेली होती.आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली आणि या भरतीला शिक्कामोर्तब करण्यात आले. सरकारने तातडीने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
पोलीस दलात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती अत्यंत आवश्यक होती. सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक तरुण-तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.मैदानी चाचण्यांपासून ते लेखी परीक्षेपर्यंतच्या तयारीसाठी ते दिवस-रात्र मेहनत करत आहेत. अशा मेहनती तरुणांना आता आता पोलीस होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक आणि इतर आवश्यक तपशील लवकरच जाहीर केले जातील, अशी अपेक्षा आहे. सरकारने हा निर्णय घेऊन तरुणाईला दिलासा दिला असून, यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी वाढण्यासही मदत होणार आहे.