लाचखोर तहसीलदार सचिन जैस्वाल यांना गडचिरोलीचा पदभार देण्यास विरोध.
📍अतिरिक्त कार्यभार न काढल्यास डाव्या पक्षांनी दिला आंदोलनाचा इशारा.
एस.के.24 तास
गडचिरोली : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे कार्यरत असतांना तेथील रेती तस्करांकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडण्यात आलेले तहसीलदार सचिन जैस्वाल यांना गडचिरोली तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यास शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाने आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार आणि आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गडचिरोलीचे तहसीलदार संतोष आष्टीकर यांची शासनाने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (संगायो) या रिक्त पदावर शासनाने नियुक्ती केली.
त्यामुळे गडचिरोली तहसीलदार हे पद रिक्त झाले होते. या पदाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (आस्था) सचिन जैस्वाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत आदेश केलेले आहेत.
सचिन जैस्वाल,हे यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे कार्यरत असतांना तेथील रेती तस्करांकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना दि. १२ एप्रिल २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते.
यावेळी त्यांच्या निवासस्थानी ३७,५२,१८० रुपये व त्यांच्या परभणी येथील राहत्या घरी ९ लाख ४० हजार रुपयांची अशी एकूण ४६ लाख ९२ हजार १८० रुपयांची रोख बेहिशोबी संपत्ती आढळून आली होती.
त्यानंतर शासनाने त्यांना शिक्षा म्हणून गडचिरोली येथे नियुक्ती दिलेली होती. असे असतांना जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या गडचिरोली तहसीलदार पदाचा सचिन जैस्वाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविणे योग्य नसून येथील रेती तस्करीला वाव देण्यासारखे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.