आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भुसारी गावातील अतुल कृषी केंद्रातून 266 रुपयांची रासायनिक खताची बॅग 350 ते 400 रुपयात विकण्याचा प्रकार उघडकीस.
एस.के.24 तास
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भुसारी गावातील अतुल कृषी केंद्रातून 266 रुपयांची रासायनिक खताची बॅग चक्क 350 ते 400 रुपयात विकण्याचा प्रकार उघडकीस आला. गरज म्हणून अनेक शेतकऱ्यांनी वाढीव दराने हे खत विकतही घेतले.
पण प्रहार संघटनेने तक्रार करताच जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी तातडीने दखल घेतली आणि काही वेळातच त्या डोंगरगावात पोहोचल्या. त्यांनी तपासणी केल्यानंतर कृषी केंद्र संचालकावर कारवाई होणार असल्याचे सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, सध्या धानपिकाला खताची गरज असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. त्यामुळे खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डोंगरगाव भुसारी येथील अतुल कृषी केंद्रात रविवारी सकाळी युरियाचा ट्रक आल्याचे कळताच शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी झुंबड केली. याचा फायदा घेत कृषी केंद्र चालकाने 266 रुपयांची खताची बॅग 400 रुपयापर्यंत दराने विकणे सुरू केले.
विक्रीचे बिलही दिले जात नव्हते,असा आरोप काही शेतकऱ्यांनी केली. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष,निखिल धार्मिक यांनी यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती देताच ते डोंगरगावात दाखल झाले.कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे हे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी तपासणी केली असता काही शेतकऱ्यांनी आपल्याला वाढीव दराने खत विक्री केली असल्याचे सांगितले. शिवाय शेतकऱ्यांना बिलही मिळालेले नव्हते असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून त्या कृषी केंद्रावर कारवाई करणार असल्याचे खोमणे यांनी सांगितले.