भीषण धडकेत मृत्यू पावलेल्या चार निरागस मुलांच्या कुटुंबियांना ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण वीस लाख रुपयांची आर्थिक मदत.
एस.के.24 तास
गडचिरोली : दि,21/08/2025 गडचिरोली - आरमोरी महामार्गावर काटली येथे 7 ऑगस्ट रोजी पहाटे भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत मृत्यू पावलेल्या चार निरागस मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण वीस लाख रुपयांची आर्थिक मदत आज देण्यात आली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ. मिलींद नरोटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मृतकांच्या पालकांना या मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
या अपघातात पिंकू नामदेव भोयर वय,१४ वर्ष,तन्मय बालाजी मानकर वय,१६ वर्ष,दिशांत दुर्योधन मेश्राम वय,१५ वर्ष आणि तुषार राजेंद्र मारबते वय,१४ वर्ष या चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांच्या हाती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील मदतीचे धनादेश देण्यात आले.
जखमींच्या उपचाराची जबाबदारी शासनाकडे : -
या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले क्षितीज तुळशीदास मेश्राम वय,१४ वर्ष आणि आदित्य धनंजय कोहपरे वय,१५ वर्ष या दोघांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारली आहे.उपचारात कोणतीही कमतरता राहू नये,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या धनादेश वितरणावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे नायब तहसीलदार चंदू प्रधान व डॉ. मनोहर मडावी तसेच आमदार डॉ.मिलिंद नरोटे श्री.प्रशांत वाघरे व श्री.अनिल पोहनकर उपस्थित होते.