गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध व साहित्य खरेदीत गैरव्यवहार प्रकरण ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ?
📍औषध खरेदी घोटाळ्यात " मोठे मासे " अडचणीत येणार ; औषध खरेदी घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची टांगती तलवार.
एस.के.24 तास
गडचिरोली : गेल्या 5 ते 6 वर्षात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध व साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा तक्रारीनंतर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी चौकशीचे आदेश दिले होते.यावरून आरोग्य उपसंचालकांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेले औषध निर्माण अधिकारी महेश देखमुख याना निलंबित करण्यात आले.
त्यानंतर आता या प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील विभागीय चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे या घोटाळ्यात देशमुखसह आणखी मोठे मासे अडचणीत येणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत औषधी खरेदीतील घोटाळे उजेडात आल्यानंतर प्रशासनात वादळ उठले होते. गडचिरोलीतही अशाचप्रकारे घोटाळा झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी याच वर्षी मार्च महिन्यात चौकशीचे आदेश दिले होते.
चौकशीच्या प्राथमिक अहवालानंतर गेल्या महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी महेश देशमुख यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून निलंबित करण्यात आले.निविदा प्रक्रिया न राबवता नातेवाईकांना औषधी खरेदीचे कंत्राट देणे, गरज नसताना अवाजवी दरात महागडे साहित्य खरेदी करणे, प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मागील आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या घोटाळ्याची विशेष समितीमार्फत चौकशी करण्याचे सुतोवाच केले.
सोबतच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांची खरडपट्टी काढली.त्यानंतर प्रशासनाच्या स्तरावर हालचाली वाढल्या असून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे,डॉ.खंडाते,डॉ.सोळंकी,डॉ.किलनाके आणि प्रशासकीय अधिकारी यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.
त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून देशमुखसह घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ.शंभरकर यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
चौकशीचा फार्स की कारवाई होणार ?
यासंदर्भात सहपालकमंत्री जयस्वाल यांनी माध्यमासमोर केलेल्या दाव्यानुसार मोठा घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे आहे.परंतु यापूर्वीही अशाच प्रकारे चौकशी करण्यात आल्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोली चे पालकमंत्री असल्याने या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाई होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.