भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा संगणकावर बसून पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.


भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा संगणकावर बसून पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.

 

एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय कार्यालयात नागरिकांच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी कार्यालयीन वेळेत संगणकावर " पत्ते " खेळताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार भद्रावती पंचायत समिती मध्ये समोर आला आहे.पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा संगणकावर बसून पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नुकतेच विधानसभेत तिन पत्ती खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्‍याचे प्रकरण राज्‍यात ताजे आहे.यामुळे माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद बदलले गेले आहे. अशात आता सरकारी बाबूही संगणाकवर पत्‍ते खेळत असल्‍याचे दिसून आल्‍याने सरकारवर टीका होत आहे.


व्हिडिओमध्ये संबंधित कर्मचारी कार्यालयात संगणकावर गेम्सच्या माध्यमातून पत्त्यांचा खेळ खेळताना स्पष्टपणे दिसून येतो.हे दृश्य एका युवकाने मोबाईलमध्ये चित्रित करून समाजमाध्यमांवर शेअर केल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या प्रकरणी भद्रावती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा व्हिडिओ पंचायत समिती कार्यालयाच्या कृषी विभागातील असल्याचे स्पष्ट केले. 

“ सदर प्रकार अत्यंत गंभीर असून,संबंधित कर्मचाऱ्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. या प्रकाराची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवालाच्या स्वरूपात पाठविण्यात येणार आहे, ” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “ कार्यालयीन वेळेमध्ये जनतेची कामे आणि शासकीय कामे प्राधान्याने पार पाडली पाहिजेत. मात्र अशा वेळेत संगणकावर बसून पत्ते खेळणे ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे.याबाबत शिस्तभंगाच्या कार्यवाहीसंदर्भात तातडीने पावले उचलली जातील असे संकेत दिले.

स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची  मागणी केली जात आहे. 

“ सरकारी कर्मचारी जर जनतेच्या कामापेक्षा स्वतःच्या करमणुकीला प्राधान्य देत असतील,तर असा कामकाजाचा दर्जा नक्कीच धोकादायक आहे, ” अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत.

प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याने भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सरकारी कार्यालयांतील कामकाजाची शिस्त आणि जनतेच्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज नागरिकांनी अधोरेखित केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !