बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलाचा मृत्यू ; संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत फोडल्या गाड्या.
एस.के.24 तास
गोंदिया : पहाटेच्या सुमारास घराच्या बाहेर लघुशंका करण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून संजयनगर मधील गावकऱ्यांनी गोठणगाव - केशोरी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.वन विभागावर रोष व्यक्त करत शासकीय वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
गोंदिया च्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर येथे सदरची घटना घडली असून वंश प्रकाश मंडल वय,5 वर्ष असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. वंश हा आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी घराच्या बाहेर आला. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केला. यात त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.
रास्ता रोको करत वाहनांची तोडफोड : -
सदरच्या घटनेनंतर संजय नगर येथील ग्रामस्थांनी मागील 4 तासांपासून गोठणगाव ते केशोरी हा मार्ग ग्रामस्थांनी रोखून धरला आहे. ग्रामस्थांच्या रोष व्यक्त करत शासनाच्या गाड्यांना तोडफोड केली आहे. जोपर्यंत मृतक चिमुकल्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत वन विभागाकडून मिळत नाही व वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पाऊल उचलत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
वन विभागावर रोष : -
यापूर्वी देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना परिसरात घडल्या होत्या. त्यावेळी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. मात्र वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे. यामुळे गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.