अहेरी येथे दसरा मेळाव्यात फुग्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट ; 20 नागरिक जखमी 2 लहान मुलांचा समावेश. 📍हायड्रोजन सिलिंडरचा जीवघेणा धोका.

अहेरी येथे दसरा मेळाव्यात फुग्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट ; 20 नागरिक जखमी 2 लहान मुलांचा समावेश.


📍हायड्रोजन सिलिंडरचा जीवघेणा धोका.


एस.के 24 तास


अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार्‍या दसऱ्याच्या पारंपरिक मेळाव्यात मध्यरा‍त्री झालेल्या फुग्याच्या सिलिंडर स्फोटाने खळबळ उडाली.राज महाल परिसरातील गॅस फुगे विक्रेत्याच्या हायड्रोजन सिलिंडरचा प्रचंड स्फोट होऊन दोन लहान मुलांसह तब्बल २० नागरिक जखमी झाले.


शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या अहेरी च्या दसऱ्या मेळाव्यात पंचक्रोशीतील नागरिक एकत्र येतात. या ठिकाणी मोठी जत्राच भरत असते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले. स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की मुख्य चौकापर्यंत धडक बसल्याचा भास झाला.


गंभीर जखमींना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगीतले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापती झाल्या आहेत.अपघाताची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.


अहेरी च्या दसऱ्यातील स्फोटाने एक गंभीर प्रश्न अधोरेखित केला आहे. यात्रांमध्ये फुगे विक्रेते आकर्षणासाठी हायड्रोजनने भरलेले फुगे विकतात. मात्र, हा वायू अतिशय ज्वलनशील असल्याने छोट्याशा चुकीनेही मोठा स्फोट होऊ शकतो. 


प्रत्यक्षात फुगे भरण्यासाठी हीलियमचा वापर करणे बंधनकारक असतानाही,खर्च वाचवण्यासाठी विक्रेते स्वस्त हायड्रोजन वापरतात.परिणामी यात्रेतील आनंदाचे वातावरण क्षणात भीषण दुर्घटनेत बदलते. या संदर्भात प्रशासन व पोलीसांनी कडक कारवाई करणे अत्यावश्यक ठरते.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !