परवान्याचा गैरवापर जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित ; वैध मापन शास्त्र विभागाची कारवाई..!

परवान्याचा गैरवापर जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित ; वैध मापन शास्त्र विभागाची कारवाई..!


एस.के.24 तास 


गडचिरोली : इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जनबंधू स्केल सर्व्हिसेस, चामोर्शी या संस्थेवर वैध मापन शास्त्र विभागाने कठोर कारवाई करत त्यांचा विक्री परवाना निलंबित केला आहे. संबंधित संस्थेकडून अधिकार नसताना लहान दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन करून देण्याच्या नावाखाली रक्कम घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक जितेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार जनबंधू स्केल सर्व्हिसेस, चामोर्शी प्रोप्रायटर अमोल नोमेश्वर जनबंधू यांचा विक्री परवाना क्रमांक LM/GDL/LD/018 दि. २९ एप्रिल २०२६ पासून निलंबित करण्यात आला आहे. तपासादरम्यान संबंधित परवानाधारकाने वैध मापन शास्त्र अधिनियम व परवान्याच्या अटींचा भंग केल्याचे आढळून आले. 

वैध मापन शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, संबंधित संस्थेला केवळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांच्या विक्रीचा परवाना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी अधिकृत अधिकार नसताना विविध किरकोळ दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी

मुद्रांकन व प्रमाणिकरण करून देण्याचे सांगत त्याबदल्यात रक्कम स्वीकारल्याचे समोर आले. वजन काट्यांचे अधिकृत पडताळणी व मुद्रांकन करण्याचा अधिकार केवळ वैध मापन शास्त्र विभागाकडे असताना अशा प्रकारे नागरिकांची व व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक आर.एन. फुलझेले यांनी नागरिक, व्यापारी व ग्राहकांनी वजन माप पडताळणी अथवा मुद्रांकन प्रक्रिया अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच करून घ्यावी,असेही आवाहन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !