कॉकरोच जनता पार्टीमुळे नवीन क्रांतीची हाक ; महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल.
एस.के.24 तास
गोंदिया : सध्या देशभरात इंधन दरवाढ आणि इंधन तुटवड्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात होत असलेली इंधन दरवाढ आणि 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
एकीकडे इंधन दरवाढ आणि महागाईने जनता होरपळून निघत असताना, दुसरीकडे इराण - इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा फटकाही देशाला बसत आहे. अशा आव्हानात्मक काळात " कॉकरोच जनता पार्टी " च्या उदयाने राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, तरुण पिढी या पक्षाशी मोठ्या प्रमाणावर जोडली जात आहे.
देशाची संपत्ती मूठभर लोकांच्या हातात एकवटली असून, कोट्यवधी लोक गरिबीत दिवस काढत आहेत. शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सरकारी शाळा बंद पडत असताना खाजगी शाळा आणि रुग्णालयांना प्रोत्साहन दिले जात असल्याने तरुणांमध्ये तीव्र असंतोष आहे. शेतकरी वर्गाची पिळवणूक थांबलेली नाही, तर नोकरी आणि शिक्षणासाठी गुणवत्ता असण्यापेक्षा वशिलेबाजीला महत्त्व दिले जात आहे.
निवडणूक हा लोकशाहीतील परिवर्तनाचा शांततापूर्ण मार्ग मानला जातो, मात्र ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तरुणांचा विश्वास कमी होत चालला आहे. सत्तेतील लोक जाती - धर्माच्या नावावर समाजात दुफळी माजवत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
" जर सरकार आणि व्यवस्थेने वेळीच दखल घेतली नाही,तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा इशारा देत, " जेवढा दबाव वाढेल,तेवढी क्रांतीची ज्योत अधिक प्रज्वलित होईल," अशी भावना तरुण वर्गातून व्यक्त होत आहे. देशाच्या हितासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

