पोलिसांनी पाठलाग करून मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले ; खून करून मृतदेह...
एस.के.24 तास
अमरावती : येथील गाडगेनगर पोलिसांचे पथक सोनसाखळी चोरीवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पहाटे गस्तीवर निघालेले असताना गाडगे नगर परिसरातील पलाश लाईन येथे एक मुलगा पोलिसांना पाहून पळून जाताना दिसला.
पोलिसांनी पाठलाग करून या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली.
या विधिसंघर्षग्रस्त मुलाने सांगितले की, त्याने त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांसोबत पुणे येथे राहणाऱ्या मित्राची हत्या केली आणि मृतदेह हा फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदूर रेल्वे मार्गावरील एसआरपीएफ कॅम्पच्या मागे टेकडीवरील नालीत फेकून दिला आहे.
या हत्या प्रकरणाची कुणालाही माहिती नव्हती. हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याने गाडगेनगर पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण चौकशी सुरू केली.
या मुलाचा मित्र रिझवान मुलानी हा पुण्यात राहणारा होता.सुमारे दहा दिवसांपूर्वी आपसातील वादातून तीन मुलांचे त्याच्यासोबत भांडण झाले. त्यातच या मुलांनी रिझवान याच्या डोक्यावर लोखंडी सळाख आणि पाईपने वार केले. त्यात रिझवान याचा जागीच मृत्यू झाला. या मुलांनी त्याचा मृतदेह एसआरपीएफ वसाहतीच्या मागे टेकडीवर निर्जन भागातील गटारात फेकून दिला होता.
विधिसंघर्षग्रस्त मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे गाडगेनगर आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना रिझवान याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला.
घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी असल्याने हे हत्या प्रकरण उघडकीस आले नाही, पण जेव्हा गाडगे नगर पोलिसांचे पथक सोनसाखळी चोरांच्या शोधात होते, तेव्हा आकस्मिकरीत्या हाती आलेल्या विधिसंघर्षग्रस्त मुलाने हत्येची माहिती पोलिसांना दिली आणि ही घटना समोर आली.
अमरावती शहरात गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग हे चिंतेचा विषय बनला आहे. यापूर्वीदेखील हत्या प्रकरणांमध्ये विधिसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या गुन्ह्याचा तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया,पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर, विजया पंधरे, भारत वानखडे,पोलीस नाईक राजेश गुरेले, पोलीस शिपाई गुलरेज खान,महेश शर्मा, नंदकिशोर करोची, रुपेश हटकर यांनी ही कारवाई केली.