एटापल्ली येथील स्टेट बँकेतील चोरी प्रकरणातील आरोपीस एटापल्ली पोलीसांनी केली अटक.

 

एटापल्ली येथील स्टेट बँकेतील चोरी प्रकरणातील आरोपीस एटापल्ली पोलीसांनी केली अटक.


एस.के.24 तास


एटापल्ली : (दि.09/01/2026) एटापल्ली येथील स्टेट बँक शाखेत अज्ञात आरोपीकडून दोन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे एटापल्ली पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन चोरीचा प्रयत्न करणा­या आरोपीस ताब्यात घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.


सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 16/12/2025 च्या मध्यरात्री एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेत एका अज्ञात आरोपीने खिडकीतून प्रवेश करुन बँकेतील लॉकर व एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडून बँकेतील रोकड रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू एटीएम मशिन व लॉकर फोडण्यात आरोपी अयशस्वी झाल्याने त्यास चोरी करता येऊ शकली नव्हती. 


सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन एटापल्ली येथे अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. 161/2025 कलम 303 (2), 305 (ई), 331 (4), 324 (5), 62 भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे एटापल्ली येथील पोलीस पथकाकडून सदर गुन्ह्रातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरु असतांना दिनांक 07/01/2026 च्या मध्यरात्री पुन्हा अज्ञात आरोपीने एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या आत प्रवेश करुन पुर्वीच्याच पद्धतीने लॉकर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.


सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. चैतन्य कदम व पोस्टे एटापल्लीचे पो.नि. मÏच्छद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात तपास पथकाने तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक पुरावे व गोपनिय बातमीदारांच्या मदतीने माहिती मिळवत संशयित इसम 


नामे बिभास ऊर्फ संजु बच्चु डे,वय 23 वर्षे रा.पिव्ही 92, पाखांजूर जि. कांकेर (छ.ग.) यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीची कसून चौकशी केली असता, चौकशीअंती आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. 


सदर आरोपीच्या अटकेमुळे भारतीय स्टेट बँक शाखा एटापल्ली येथे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दिनांक 12 जानेवारी 2026 पर्यंत एकूण 05 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्ह्रांचा पुढील तपास मपोउपनि. रोहिणी गिरवलकर,पोस्टे एटापल्ली करीत आहेत.   

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री.चैतन्य कदम व पोस्टे एटापल्लीचे पोनि.मचिन्द्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात सपोनि. मोतीराम मडावी,पोउपनि. गजानन साखरे, मपोउपनि.रोहिणी गिरवलकर, मपोउपनि. प्रतिक्षा वणवे व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !