महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेलगतच्या अबूझमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांचा " खजिना " उद्ध्वस्त ; एक कोटींची रोकड,एके-४७ सह शस्त्रसाठा जप्त.
एस.के.24 तास
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचा साठा आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचे मोठे घबाड सुरक्षा दलांच्या हाती लागले.
१२ मे रोजी झालेल्या या कारवाईत १ कोटी १ लाख ६४ हजार रुपयांची रोकड, एके-४७ रायफल्ससह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या आर्थिक जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
नारायणपूर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील अबूझमाड परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरक्षा दलांचे व्यापक शोधमोहीम अभियान सुरू आहे. गावकरी आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनंतर नारायणपूर पोलीस
डीआरजी,एसटीएफ,आयटीबीपी आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने जंगलातील एका संशयित ठिकाणी छापा टाकला.यावेळी नक्षलवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेली कोट्यवधींची रोकड आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा उघडकीस आला.
सुरक्षा दलांनी थेट नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात शिरून ही मोहीम यशस्वी केल्याने संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरक्षा यंत्रणांमध्ये आहे. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेली रोकड ही खंडणी आणि अवैध वसुलीतून जमा करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घातपाताचा कट उधळला : -
ही रक्कम मोठ्या हिंसक कारवाया घडवून आणण्यासाठी, नव्या भरतीसाठी आणि संघटनात्मक विस्तारासाठी वापरण्याचा नक्षलवाद्यांचा मानस होता, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. मात्र, सुरक्षा दलांनी वेळेत कारवाई करत हा संभाव्य कट उधळून लावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारवाईदरम्यान ३ एके-४७ रायफल्स, ३ एसएलआर रायफल्स, १३२ बीजीएल सेल्स, ३०३ आणि ३१५ बोर रायफल्स, १२ बोर बंदुका, देशी कट्टे, मोठ्या प्रमाणावर काडतुसे, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स, कॉर्डेक्स वायर, वॉकी-टॉकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईनंतर अबूझमाड परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आले आहे. जंगल परिसरात संशयास्पद हालचाली अथवा साहित्य आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नारायणपूरचे पोलिस अधीक्षक रोबिनसन गुडिया यांनी नागरिकांना केले आहे.

