नगर पंचायत सिरोंचा कार्यालय परिसरात उभी असलेल्या दुचाकीला आग.


नगर पंचायत सिरोंचा कार्यालय परिसरात उभी असलेल्या दुचाकीला आग.


एस.के.24 तास 


सिरोंचा :- नगर पंचायत कार्यालय परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास उभी असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी अंदाजे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.नगर पंचायत कार्यालयाच्या कंपाउंडमध्ये उभी असलेल्या मोटारसायकलमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण वाहनाला वेढले. 

घटनेनंतर कार्यालय परिसरात उपस्थित कर्मचारी, नागरिक तसेच ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाला आग लागल्यानंतर कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची शक्यता असल्याने कोणीही सुरुवातीला वाहनाजवळ जाण्याचे धाडस केले नाही. 

आगीची तीव्रता वाढत असल्याने परिसरातील इतर वाहने तसेच कार्यालयालाही धोका निर्माण झाला होता.काही वेळासाठी परिसरात अफरा-तफरीची परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान एका युवकाने प्रसंगावधान राखत मोठे धाडस दाखविले. त्याने पाइपच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. 

युवकाच्या तत्परतेमुळे काही मिनिटांत आग आटोक्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संबंधित दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्याच ठिकाणापासून अवघ्या दहा फुटांच्या अंतरावर नगर पंचायतची अग्निशमन गाडी उभी होती. 

त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते.घटनेनंतर नगर पंचायत परिसरातील सुरक्षाव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, आपत्कालीन परिस्थितीत अधिक तत्पर यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

दुचाकीला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !