सिरोंचा तालुक्यातील टेकडा येथे राम नवमी उत्साहात साजरी ; महाप्रसादाचे वाटप.

सिरोंचा तालुक्यातील टेकडा येथे राम नवमी उत्साहात साजरी ; महाप्रसादाचे वाटप.


एस.के.24 तास 


सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील टेकडा (टेकडा ताला) येथे राम नवमीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.पहाटे काकड आरती, त्यानंतर पूजाअर्चा,रामरक्षा पठण,भजन - कीर्तन आणि श्रीराम जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गावातील महिला, पुरुष, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीरामाच्या जन्मोत्सवात सहभागी झाले.


दुपारी बारा वाजता श्रीराम जन्माचा सोहळा पार पडला. त्या वेळी मंदिर परिसरात अत्यंत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आरती सादर केली, तर युवकांनी श्रीरामांच्या प्रतिमेसह मिरवणूक काढली. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 


उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई व पताकांनी सजविण्यात आला होता. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद वितरण करण्यात आल्याने कोणतीही गैरसोय झाली नाही.ग्रामस्थांनी स्वखर्चाने व स्वयंसेवकांच्या मदतीने व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !